Monday, June 8, 2026

शिक्षणाचा मूलभूत उद्देश : “मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम राहून त्यांना आनंदाची अनुभूती होणे”

 

       आपण लहान मुलांना नेहमी स्वच्छंद हसताना बघतो. चेहऱ्यावरचे हास्य त्यांच्या आनंददायी स्वभावाचे प्रतीक असते. पण जेव्हा प्राथमिक शिक्षेसाठी शालेय जीवनात प्रवेश होतो, तेव्हा त्यांचे हेच हसू काही प्रमाणात कमी होते. पुढे जेव्हा प्राथमिक स्तरावर वाटचाल होते, तेव्हा त्यांचे हास्य अजूनही कमी होत जाते. कालांतराने उच्च माध्यमिक स्तरावर पोहोचेपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावरील हसू पूर्णपणे लुप्त झाल्याचे दिसून येते.

      महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थी गंभीर तसेच चिंतित होतात. त्याचप्रमाणे शैक्षणिक वळणावर विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या मनात अनेक प्रश्न व समस्या निर्माण होतात. जसे की विशिष्ट व्यवसाय/ पद यासाठी लागणारी कौशल्य, प्रतिस्पर्धा तसेच त्याविषयी निगडित आर्थिक समस्या इत्यादी. आपल्याला ह्याच मूलभूत समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे.

      आपण अशी शैक्षणिक व्यवस्था निर्माण करू शकतो काय, ज्यामध्ये शिक्षण घेण्यापासून ते नोकरी/ व्यवसायिक संधी मिळेपर्यंतच्या प्रवासादरम्यान मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य कायम राहील. हे तेव्हाच शक्य आहे, जर आपण आपली शिक्षण व्यवस्था परिवर्तनशील आणि सृजनात्मक बनवू. मुलांच्या आवडीनुसार व क्षमतेनुसार त्यांना पूर्ण रोजगार/ व्यावसायिक संधी उपलब्ध करून देऊ शकू. यासाठी वेगवेगळ्या स्तरावर विशेष लक्ष देऊन उपाययोजना प्रत्यक्षात आणणे  स्वागतार्ह  ठरेल.

प्रारंभिक/ प्राथमिक शिक्षा

  • मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करून शिक्षण प्रक्रियेत मुलांच्या सर्वांगीण तसेच सृजनात्मक विकासाला प्रोत्साहन देणे.
  • शिक्षणाविषयी व अभ्यासाविषयी गोडी निर्माण करून चिंतन/ बौद्धिक तथा शारीरिक कौशल्याचा संबंध प्रस्थापित करणे.
  • पाठ्यक्रम, अध्ययनाची/ शिकविण्याची पद्धती, परीक्षा पद्धती यामध्ये सुधारणा करणे.
  • मुलांमधील सुप्त गुणांना ओळखून त्यांना प्रतिभा संपन्न बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवणे. तसेच कलात्मक, नावीन्यपूर्ण आणि सृजनात्मक विकास यासाठी विशेष जोर देणे.

माध्यमिक शिक्षा

  • माध्यमिक स्तरावर प्रयोग, समस्येचे निदान व निराकरण, संघात्मक क्रिया व नेतृत्व क्षमता या कौशल्यांचा विकास यासाठी प्रयत्नशील राहणे
  • वर्गातील अभ्यास जेवढा महत्वपूर्ण आहे, तेवढेच व्यावहारिक  ज्ञान आवश्यक आहे. व्यावहारिक  जीवनात विद्यार्थी स्व अनुभवातून काय धडे घेत आहेत? त्याचे परीक्षण करणे व मार्गदर्शन करणे.
  • विद्यार्थ्यांनी दृकश्राव्य माध्यम, प्रत्यक्ष भेटी, प्रयोग तसेच परिसंवाद यासारख्या माध्यमातून सक्रीय सहभाग घेतला पाहिजे.


उच्च शिक्षा/पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून प्रत्येक विद्यार्थी स्वावलंबी बनावा. ज्यामुळे तो उद्यमशील होऊन रोजगार शोधणारा बनण्याऐवजी स्वतः रोजगार निर्मिती करेल. अशा पद्धतीचे व्यापक धोरण अवलंबणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यालय/ महाविद्यालयांनी केवळ शिक्षा केंद्राचे स्थान न बनता, त्या ऐवजी व्यापक दृष्टिकोन ठेवून ज्ञानाबरोबरच कौशल्यप्राप्ती  करण्यावर भर देणे व त्याप्रमाणे परिवर्तन करणे ही आधुनिक काळाची गरज आहे.


शैक्षणिक धोरण

बालपण ते नोकरी/ व्यावसायिकतेसाठी लागणाऱ्या क्षमता/ कौशल्य आत्मसात करेपर्यंत आपण वेगवेगळ्या शैक्षणिक अवस्थातून जात असतो. शिशु, किशोर, युवक आणि प्रौढ अशा विविध अवस्थेपासून एक परिपक्व नेतृत्व घडविण्यापर्यंतचा हा प्रवास. सगळ्यांसाठी जीवनातील विविध गरजांची परिपुर्तता हे आव्हानात्मक ठरते. त्याचा सामना प्रत्येक जण आपापल्या परीने नेटाने करत असतो. जसे की, लहान मुलं/ शिशु इतरांकडून मदतीची भावना ठेवते. किशोरवयीन मुलं आपले काम स्वावलंबनाने करण्यास प्रयत्नशील असतात. तसेच युवा काही कार्य सहकार्यांसोबत मिळून करू पाहतात. परंतु एक उत्तम नेतृत्व इतरांच्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असते.

शिक्षण व्यवस्थेचे हे कर्तव्य आहे की, "एका शिशूचे सुयोग्य नेतृत्वात नेतृत्वात परिवर्तन करणे तसेच जबाबदार नागरिक घडवणे. त्याला दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवण्याऐवजी दुसऱ्यांची मदत करणारा बनवणे".

 

मुख्याध्यापक/ प्राचार्य यांची भूमिका

या संपूर्ण कार्याच्या परिपुर्ततेसाठी एक उत्तम नेतृत्व आवश्यक असते त्यामुळेच शैक्षणिक व्यवस्थेतील प्रथम शिक्षक म्हणजेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, महाविद्यालयाचे प्राचार्य यांना दूरदृष्टी आवश्यक आहे. शैक्षणिक मार्गदर्शना सोबतच मुलांना प्रेरणा देण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. तसेच शिक्षकांनी मुलांना कशा पद्धतीने शिकवावे ज्यातून त्यांची उत्कृष्ट प्रतिभा विकसित होईल यासाठी आकृतीबंध नियोजन व त्याबद्दलची अंमलबजावणी सुनिश्चित करणे. त्यामुळेच  प्रथमतः मुख्याध्यापक / प्राचार्य यांना स्वतःला एक सुयोग्य शिक्षक बनवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन पालक विद्यार्थी शिक्षक यामधील सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे.

 

पालकांची भूमिका

मुलांना शिक्षित आणि जबाबदार नागरिक बनवण्याच्या प्रक्रियेत आई-वडिलांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. त्यासाठी आपल्या मुलांच्या चांगल्या तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी, नैतिकतेसाठी सजग राहणे आवश्यक आहे. मुलं आपल्या आई-वडिलांचे ,गुरुजनांचे अनुकरण करतात, त्यामुळे पालकांनी मुलांसमोर आपल्या व्यवहार आणि आचरणातून आदर्श ठेवला पाहिजे. यामुळे मुलांच्या मनात आपल्या आई-वडिलांविषयी प्रेम आणि श्रद्धा भाव विकसित होतो.


सामूहिक भूमिका

कुठल्याही मुलाला प्रबुद्ध नागरिक बनवण्यात आई वडील आणि शिक्षक यांची भूमिका महत्वपूर्ण आहे घरामध्ये मुलांचे संगोपन अतिशय प्रेमपूर्वक केले जाते, परंतु थोडे मोठे झाल्यावर त्यांना मूल्यांवर आधारित शिक्षण देण्याची आवश्यकता असते. ही शिक्षा विद्यालय तसेच महाविद्यालय यामध्ये दिली जाते. ज्यामुळे व्यक्तित्व निर्माण होण्यास मदत होते. विद्यालयात दिली जाणारी शिक्षा ही उद्देश पूर्ण तसेच जीवनमूल्यांवर आधारित असली पाहिजे.

      आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांकडे विविध स्त्रोत उपलब्ध आहे इंटरनेट च्या माध्यमातून माहितीचे भांडार उघडले आहे. माहितीच्या अथांग सागरातून विद्यार्थी उपयुक्त ज्ञान, नैतिक पद्धतीने कसे मिळवतील याकडे शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे. त्याचबरोबर स्वयंप्रेरणेने शिकण्याची कौशल्य अवगत केले पाहिजे. विद्यार्थ्यांची एखाद्या खास विषयातील रुची व आवड लक्षात घेऊन त्याचा विकास केला पाहिजे. त्याचबरोबर मुलांनी अभ्यासात चिकाटी सातत्य व सतत शिकत राहण्याचा संकल्प करावा. ज्यामुळे एक वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल. तसेच स्वयंप्रेरणेने शिकण्याचे कौशल्य अवगत केले पाहिजे. अशा प्रकारे सामूहिक भूमिकेतून शैक्षणिक प्रक्रियेत, वैयक्तिक योगदानातून विकास साधता येणे सहज शक्य आहे.


प्रा. धम्मरत्न सुरेश दाभाडे

 

(संदर्भ - प्रस्तुत सारांश हा भारताचे माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक डॉ. ए पी जे कलाम  लिखित ‘अदम्य साहस’ ह्या पुस्तकावर आधारित आहे. )

No comments:

Post a Comment